प्रथम गटारीचे काम पूर्ण करून नंतर रस्त्याचे काम हाती घेतली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या स्मार्ट सिटी लिमिटेडने प्रथम रस्त्याचेच काम हाती घेऊन शिवाजीनगरवासियांचा विश्वासघात केला आहे. परिणामी सध्या रस्त्याचे काम आम्ही बंद पाडले असून गटारीचे काम झाल्याखेरीज अन्य कोणतीही कामे करू दिली जाणार नाहीत, असा इशारा दिला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू खटावकर यांनी दिली.
शिवाजीनगर येथील सोन्या मारुती चौक अर्थात आरटीओ सर्कल येथील गटारीचे काम प्रथम करण्याऐवजी रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे शिवाजीनगर वासियांनी ते काम आज बंद पाडले. यासंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना राजू खटावकर यांनी उपरोक्त माहिती दिली. गेल्या 20 दिवसापूर्वी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर, इंजिनीयर प्रभू पाटील, साईट इंजिनिअर हुसेन आदी मंडळी शिवाजीनगर येथील आरटीओ सर्कल ते किल्ला सम्राट अशोक सर्कल पर्यंतचा रस्ता आणि गटारीच्या विकास कामांसंदर्भात पाहणी करण्यास आले होते. त्यावेळी त्यांनी प्रथम गटार बांधकामाचे काम पूर्ण करून त्यानंतरच रस्त्याचे विकास काम हाती घेईल असे आश्वासन दिले होते.
मात्र आज अचानक येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता गटारीसाठी खोदलेले खड्डे बुजवून रस्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शिवाजीनगर येथील काही जागरूक कार्यकर्त्यांनी याची कल्पना आम्हाला दिली. तेंव्हा आम्ही लागलीच घटनास्थळी येऊन रस्त्याच्या कामाला तीव्र आक्षेप घेऊन ते काम बंद पाडले. तसेच तुमच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रथम गटार बांधकाम पूर्ण करून त्यानंतरच रस्त्याचे काम हाती घेतले जाईल असे सांगितले असताना तुम्ही आधी रस्त्याचे काम का करत आहात? असा सवाल केला असता. संबंधित कंत्राटदाराने आम्हाला प्रथम रस्त्याचे काम करण्यास सांगण्यात आले आहे हे काम झाल्यानंतर पुढे महापालिकेकडून गटारीचे बांधकाम हाती घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
तेंव्हा आमचा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना एकच प्रश्न आहे की रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गटारीचे काम केंव्हा आणि कसे काय करणार? कारण त्यामुळे चांगल्या प्रकारे केलेल्या रस्त्याची पुन्हा दुरावस्था होणार आहे, असे खटावकर यांनी सांगितले.
सदर गटारीचे बांधकाम होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण 2 वर्षांपूर्वी या गटारीमुळेच संपूर्ण शिवाजीनगरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत चढले होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी आता स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक असणारे शशिधर कुरेर महापालिका आयुक्त होते. मात्र त्यांनी त्यावेळी फक्त आश्वासन देण्यापलीकडे काहीही केले नाही. आताही तोच प्रकार सुरू असल्यामुळे जोपर्यंत येथील गटारी तुमचे बांधकाम होत नाही तोपर्यंत सोन्या मारुती अर्थात आरटीओ सर्कल ते सम्राट अशोक सर्कलपर्यंत कोणतेही विकास काम हाती घेतले जाऊ नये. जर का विकास काम केल्यास आम्ही शिवाजीनगरवासीय ते खोदून टाकू आणि याची संपूर्ण जबाबदारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडवर राहील, असेही राजू खटावकर यांनी स्पष्ट केले.
शिवाजीनगर येथील पेट्रोल पंपाबाबत तक्रार करताना सदर पेट्रोल पंप हा महापालिकेच्या जागेत बेकायदेशीररित्या सुरु असल्याचा आरोप खटावकर यांनी केला. त्याचप्रमाणे सदर पेट्रोल पंप चालकाने मुख्य रस्त्याच्या जवळपास 20 ते 25 फूट जागेवर अतिक्रमण केले असल्याचा देखील आरोप केला. यामुळे शेजारी असलेल्या मेटगुड हॉस्पिटलमध्ये ये-जा करणारी वाहने आणि रुग्णवाहिकेला अडचण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या ठराविक भागात अपघाताचा धोका वाढला आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून पेट्रोल पंप चालकाने केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू खटावकर यांनी यावेळी केली.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1345926672431589/