Friday, December 20, 2024

/

गटारीनंतरच रस्त्याचे विकास काम : शिवाजीनगर वासियांमध्ये समाधान

 belgaum

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोन्या मारुती चौक (आरटीओ सर्कल) ते किल्ला येथील सम्राट अशोक चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम हे गटारीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच हाती घेण्यात येईल आणि त्या दृष्टीने उद्यापासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे शिवाजीनगर वासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शिवाजीनगर येथील सोन्या मारुती चौक (आरटीओ सर्कल) येथील गटारीचे काम प्रथम करण्याऐवजी रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे शिवाजीनगर वासियांनी ते काम काल सोमवारी बंद पाडले होते.

तसेच जोपर्यंत येथील गटारीचे बांधकाम होत नाही तोपर्यंत सोन्या मारुती अर्थात आरटीओ सर्कल ते सम्राट अशोक सर्कलपर्यंत कोणतेही विकास काम हाती घेतले जाऊ नये. जर का विकास काम केल्यास आम्ही शिवाजीनगरवासीय ते खोदून टाकू आणि याची संपूर्ण जबाबदारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडवर राहील, असा इशारा काल शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू खटावकर यांनी दिला होता.

Rto circle
Rto circle

याबाबतचे वृत्त बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध करताच आज मंगळवारी स्मार्ट सिटीचे इंजिनीयर प्रभू -पाटील, साईट इंजिनिअर हुसेन आदी अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या ठिकाणी शिवाजीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच प्रथम गटार बांधकामाचे काम पूर्ण करूनच सोन्या मारुती चौक ते सम्राट अशोक चौक आतापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाईल असे स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे सदर रस्ता आणि गटारीचे काम करण्यापूर्वी केएसआरटीसीचा बस डेपो या मार्गावर असल्यामुळे त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी बस वाहतुकीसाठी हॉटेल किर्तीच्या बाजूला असलेली बस डेपोची भिंत पाडून केएसआरटीसीला रहदारीसाठी तात्पुरता मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी सूचना केली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी पेव्हर्सचा रस्ता वर्षभरात खराब होत असल्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जावे अशी मागणी केली. तसेच गटारीचे बांधकाम पूर्ण झाल्याखेरीज रस्त्याचे काम हाती घेतले जाऊ नये असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तेंव्हा अधिकाऱ्यांनी उद्या रात्रीपासूनच कटर लावून पूर्वीचे जुने गटार तोडण्याचे काम हाती घेतले जाईल आणि त्यानंतर गटार बांधकाम पूर्ण करून या ठिकाणच्या रस्त्याचे काम आम्ही हाती घेऊ असे सांगितले. तेंव्हा याची कल्पना आम्हाला काल देण्यात आली असती तर आम्ही काम पण बंद पाडले नसते असे नागरिकांनी सांगितले.

याप्रसंगी शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू खटावकर, विजय पवार,  घाटगे, जगदीश पुरोहित, सुशांत पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान संबंधीत रस्ता आणि गटारीच्या विकास कामाबाबत वेळोवेळी आवाज उठवून सहकार्य केल्याबद्दल शिवाजीनगर वासियांच्यावतीने राजू खटावकर यांनी बेळगाव लाईव्हला धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.