कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात सध्या जो तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने त्यांच्या राज्यातील कन्नडगांच्या सुरक्षेची हमी द्यावी अन्यथा कर्नाटकला नाइलाजाने केंद्राकडे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
अथणी येथे पत्रकारांशी बोलताना बेळगावात अलीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारच्या फलकाची जी मोडतोड करण्यात आली त्या घटनेचा निषेध करून या घटनेमुळे महाराष्ट्रात वास्तव्य करून असणाऱ्या कन्नडिगांना इजा पोहोचवली जाऊ नये असे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढविताना सवदी म्हणाले की, हे सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्या बरोबरच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र सरकार जनतेचे लक्ष सीमावादकडे वळत आहे. गेल्या कांही दिवसांपासून दोन्ही राज्यांमधील तणाव वाढत आहे.
बेळगावात कारवरील फलकाच्या मोडतोडीची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी मागील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर रहदारी करणाऱ्या कर्नाटक पासिंगच्या लाॅऱ्या -ट्रक आदी वाहने अडविली. त्यांनी कोल्हापुरातील कन्नड भाषिकांच्या दुकानांच्या नामफलकांवर काळे फासले. कर्नाटक परिवहन मंडळाच्या कांही बस गाड्यांचे नुकसान तर केलेच शिवाय त्यांच्याही फलकांना काळे फासले. या पद्धतीने कांही दिवसांपासून जबरदस्तीने वाहतूक सुविधा बंद पाडण्यात आली आहे. एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने त्यांच्या राज्यातील कन्नडगांच्या सुरक्षेची हमी द्यावी अन्यथा कर्नाटकला नाइलाजाने केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.