बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकसंघ आहोत, लक्ष्मी हेब्बाळकर असो किंवा सतीश जारकीहोळी पक्ष संघटनेसाठी आमचे विचार एकच आहेत, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. भूतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाला आज केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाकयुद्ध ये सर्वांना माहीतच आहे. एकामागोमाग एक टोला-प्रतिटोला लागवणाऱ्या जारकीहोळींनी हेब्बाळकरांना टोला लगावताच लक्ष्मी हेब्बाळकरांनी बेळगावच्या कुंद्यासह गोकाकचा कर्दन्टदेखील छान असल्याचे विधान केले होते. या विधान चर्चेचा विषय बनत असतानाच केपीसीसी कार्याध्यक्षांनीही याच विधानावर जोर दिल्याने पुन्हा हा चर्चेचा विषय बनला आहे.
गोकाक कर्दन्ट हा बेळगावमध्येही मिळतो, गोकाकमध्येही मिळतो, मॅजेस्टिकमध्येही मिळतो आणि ऑनलाईन ऑर्डर केल्यास दुबईमध्येही मिळू शकतो, अशा शब्दात सतीश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा खिल्ली उडवली. रमेश जारकीहोळींना मात देण्यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर आणि आपले जॉईंट व्हेंचर असून केवळ गोकाकचं नाही तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आणून पक्ष बळकटीसाठी एकसंघ राहणार असल्याचा निर्धार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
भूतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाचे सर्व कामकाज पूर्णत्वाला आले असून लवकरच जनतेसाठी हे प्राणिसंग्रहालय खुले करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या या प्राणिसंग्रहालयात वाघ सफारीचीही व्यवस्था करण्यात आली असून यासह पाणी, शौचालय आणि कँटीनचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपण सुरुवातीपासून येथे प्राणिसंग्रहालय व्हावे यासाठी मागणी करत होतो. परंतु आता या मागणीला चालना मिळाली असून सुरुवातीच्या टप्प्यात तीन सिंह प्राणी संग्रहालयात आणण्यात आले असून येत्या कालावधीत वाघ, चित्ता यांच्यासह अनेक प्राणी या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत. येथील लोकांना म्हैसूरमध्ये जाऊन प्राणी संग्रहालय पाहावे लागत होते. परंतु आता बेळगावमध्ये प्राणिसंग्रहालय झाल्याने प्रत्येकासाठी हि पर्वणी ठरली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनाही या संग्रहालयाकडे येण्यासाठी सोय करण्यात आली असून संग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली.
यावेळी सीसीएफ बसवराज पाटील, डीसीएफ अमरनाथ, एसीएफ मल्लनाथ कुसनाळ, प्राणिसंग्रहालय व्यवस्थापक राकेश अर्जुनवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.