बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. बंगळूर येथे नुकतेच सिद्धरामय्या यांनी हि उमेदवारी जाहीर केली होती. परंतु अधिकृतपणे नाव घोषित करण्यात आले नव्हते. आज केंद्रीय समितीच्यावतीने सतीश जारकीहोळी यांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले असून जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षाने गुरुवारी दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी सौ. मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी बंगळूर येथे सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी बेळगाव पोटनिवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. शुक्रवारी एआयसीसीतर्फे अधिकृत आदेशपत्र प्रसिद्धीस देण्यात आले असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सतीश जारकीहोळींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सतीश जारकीहोळी हे २०२३ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सतीश जारकीहोळी उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी समर्थकांनी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक न लढविण्याचे आवाहन केले. काही समर्थकांनी गुरुवारी सतीश जारकीहोळी यांनी पोटनिवडणूक लढवू नये यासाठी विरोध दर्शविला.
काँग्रेसतर्फे ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश जारकीहोळी यांचे नाव चर्चेत होते. तर भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी पक्षश्रेष्टींकडे होती. या सर्व उमेदवारांच्या यादीतून एखाद्या उमेदवाराची निवड करणे हे भाजपासाठी थोडे मुश्किल होते.
परंतु भाजपचा उमेदवार कोण? या बहुचर्चित प्रश्नाला पूर्णविराम मिळाला. एकीकडे सतीश जारकीहोळी आणि दुसऱ्या बाजूला मंगला अंगडी यांच्यासह राष्ट्रवादी, समिती आणि इतर उमेद्वारांमधील निवडणुकीची रंगत येत्या कालावधीत प्रचार आणि निवडणुकीत दिसून येणार आहे.