आयएमए ज्वेलर्स व समूहाने फसवणूक केल्याच्या प्रकरणासंबंधी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेले चार्जशीट उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले आहे. त्यामुळे या प्रकरणात हेमंत निंबाळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक व्याज देण्याच्या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांना बेंगलोर मधील आयएमए समूहाने गंडा घातला होता. हे प्रकरण उघड होण्यापूर्वीच रिझर्व बँकेने चौकशी करण्याची सूचना दिली होती.
त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी चौकशी करून आयएमए समुहाकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल सादर केला होता.
हा अहवाल सादर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच देण्यात आल्याचा अनेकांवर आरोप झाला होता. हे फसवणूक प्रकरण उघड झाल्यानंतर सीबीआयने तपास करून चार्जशीट दाखल केले होते.
आपले वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांना या प्रकरणात का वगळण्यात आले? या आधारावर तसेच जाणून-बुजून आपल्याला यात गोवण्यात आले असल्याचा आरोप करत. तसेच आपल्या विरोधात दाखल झालेले प्रकरण रद्द करावे अशी विनंती करत हेमंत निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत सीबीआयने ज्या 11 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते त्यामध्ये हेमंत निंबाळकर पाचवे आरोपी आहेत.