रमेश जारकीहोळी सीडी प्रकरण दिवसेंदिवस नवनवे वळण घेत आहे. संबंधित प्रकरणातील युवती, तिने प्रसारित केलेले व्हिडीओ, परस्परविरोधी केलेल्या तक्रारी आणि त्यानंतर रमेश जारकीहोळींचे खळबळजनक वक्तव्य! या साऱ्या प्रकारानंतर प्रत्येकामध्ये या प्रकरणाविषयी नवे कुतूहल निर्माण झाले आहे.
सदर युवतीने आज (शनिवार, दि. २७) आत्महत्येचा इशारा देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यापाठोपाठ रमेश जारकीहोळींनी एका मोठ्या खुलाशाचे वक्तव्य केले आहे. या प्रकरणातील युवतीने आता आपली चाल चालली आहे आता माझी वेळ असून माझा गेम यानंतर सुरु होईल, आणि शनिवारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत एक मोठी बातमी सर्वांना कळेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
रमेश जारकीहोळींनी हे वक्तव्य नेमके कोणत्या आधारावर केले आहे? यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? या प्रकरणात इतर कुणाचा समावेश आहे का? रमेश जारकीहोळींकडे नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले असून जारकीहोळींच्या खुलाशानंतर या प्रकरणाला पुन्हा वेगळी कलाटणी लागेल कि राजकीय वर्तुळात भूकंप येईल, याची शंका बळावत आहे.
सदर युवतीने आज व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे कि, आपला व्हिडीओ हेतुपूर्वक प्रसारित करण्यात आला आहे. परंतु जारकीहोळींनी यावर उत्तर देताना असे म्हटले आहे कि, आपण युवतीचा ऑडिओ,व्हिडीओ प्रसिद्ध केलेला नाही. काँग्रेस प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. शनिवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत एक मोठी बातमी सर्वांना कळेल. एफआयआर दाखल केला म्हणजे संबंधित व्यक्ती आरोपी होत नाही. संबंधिताची चौकशी होते.
चौकशीतून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवकुमार कायम रहावेत अशी आपली इच्छा आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. आपण एकत्र पक्षसंघटना केली होती. त्यांनी आपल्याला कितीही त्रास दिला तरी त्याचे दु:ख नाही. त्यांचे चांगले व्हावे, अशीच प्रार्थना करेन. आपल्याकडील पुरावे आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. त्या युवतीने आणखी दहा व्हिडीओ व्हायरल केले तरी कोणतीही भीती नाही. कोणत्याही कारणास्तव जामीन मिळवणार नाही. त्या युवतीने इतके दिवस तक्रार का दिली नाही? मी अशा अनेक तक्रारींचा सामना करण्यास तयार आहे, मी एका सरकारला सत्तेवरून खाली आणून दुसरे सरकार स्थापित केले. त्यापुढे हे प्रकरण काय आहे ? असे जारकीहोळी म्हणाले.
रमेश जारकीहोळींविरोधात हे प्रकरण पुढे आल्यानंतर कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता
शनिवारी सायंकाळी मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी बाहेर पडतील, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आतापर्यंत आपण सीडी प्रकरणामागील सत्य उघड केले नव्हते. ती वेळ आता आली असल्याचे जारकीहोळींनी स्पष्ट केले आहे. सदर प्रकरण माझ्या विरोधात राजकीय षड्यंत्र आहे. या प्रकरणाविषयीची अधिक माहिती मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिली आहे.
माझ्या तक्रारीनुसार सीडी प्रकरणातील संशयितांच्या घरात सापडलेले दागिने आणि पैशाच्या संदर्भात सर्वप्रथम चौकशी केली जावी. सीडी प्रकरणातील ‘महानायक’ कोण आहे हे आपल्याला ठाऊक आहे. असा गौप्य्स्फोटदेखील जारकीहोळींनी केला आहे. आपले धाकटे भाऊ भालचंद्र जारकीहोळी यांंच्याशी 2 तास चर्चा केल्यानंतर रमेश जारकीहोळींनी एक नवा गौप्य्स्फोट केला असून या वक्तव्यानंतर सरकारलाच एकप्रकारे आव्हान देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.