अश्लील सीडी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रमेश जारकीहोळीनंनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राजीनामा सुपूर्द केला होता.
मुख्यमंत्र्यांनी सदर राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला असून रमेश जारकीहोळींचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत स्वीकृतीपत्र प्रसिद्धीस देण्यात आले आहे
राज्यपाल वजुभाई वाला यांनी रमेश जारकीहोळींचा राजीनामा स्वीकार केल्याचे या स्विकृती पत्रात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी रमेश जारकीहोळी आणि एका युवतीसंदर्भातील सीडी प्रकाशित करण्यात आली. यानंतर कर्नाटकाच्या राजकारणात मोठा भूकंप आला.
यानंतर पक्षाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, आपल्यामुळे पक्षाची हानी होऊ नये, यासाठी स्वतः जारकीहोळींनी बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे आपले राजीनामापत्र सुपूर्द केले. या राजीनाम्याचा स्वीकार करण्यात आला असून येडियुरप्पा मंत्रिमंडळात पुन्हा एक मंत्रिपद रिक्त झाले आहे.