केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे आज बेळगावमध्ये आगमन झाले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी डी. के. शिवकुमार बेळगावमध्ये आले आहेत. रविवारी सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
यावेळी रमेश जारकीहोळी समर्थकांनी त्यांना काळे निशाण दाखवून त्यांचा निषेध केला. तसेच विमानतळावर त्यांच्याविरोधात ‘डीकेशी गो बॅक”, काँग्रेसचा धिक्कार असो यासह अनेक घोषणाही देण्यात आल्या.
रमेश जारकीहोळी समर्थकांनी सांबरा विमानतळापासून विमानतळाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काळे निशाण दाखवून डी. के. शिवकुमार सांबरा विमानतळामधून बाहेर निघताना त्यांच्या वाहनावर हल्ला चढविण्यात आला. डीकेशींच्या वाहनाला घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांनी डीकेशींच्या वाहनावर चप्पलफेक केली.
पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आंदोलकांना पांगवण्यात आले. यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. परंतु वेळीच त्यांना पोलिसांनी अडविले.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्लाही केला. डीकेशींसोबत असलेल्या कर्मचाऱ्याला अडवून हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी सदर कर्मचाऱ्याला आंदोलकांच्या तावडीतून सोडवून दुचाकीवरून सुरक्षितपणे हलविले.