जिल्हा धर्मादाय विभागाने बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 16 देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश बजाविले आहेत. यासंदर्भात 18 फेब्रुवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
यामध्ये दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री कपिलेश्वर देवस्थान, शहापूर येथील अंबाबाई मंदिराचा समावेश आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून मंदिरांमधील सरकारी हस्तक्षेपाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी याविरोधात सरकारला सुनावले असून, हा आदेश मागे घेण्यात यावा, अन्यथा संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू बांधवांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
धर्मादाय विभागाने दिलेले आदेश हे अत्यंत चुकीचे असून सध्याच्या सरकारला हिंदुत्ववादी असल्याकारणाने निवडून दिले आहे. धर्मादाय विभागाने जाहीर केलेल्या १६ देवस्थानांमध्ये केवळ हिंदू धर्माच्या देवस्थानांचीच नावे आहेत. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा या आदेशात कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही.
हिंदूंच्या देवस्थानावर प्रशासकीय हुकूमत गाजविणे हे साफ चुकीचे असून सरकार हिंदू धर्मियांच्या देवस्थानांवर कुऱ्हाड चालविण्याच्या विचारात असेल, तर पुन्हा एकदा या आदेशावर विचार करावा, असे त्यांनी सांगितले आहे. सरकारला केवळ हिंदू धर्मियांचीच मंदिरे दिसत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही हिंदू धर्माच्या मंदिरात, देवळात अथवा कोणत्याही देवस्थानात धर्म परिवर्तन करण्यात येत नाही. किंवा आतंकवादीही रहात नाहीत. हिंदू धर्मियांनी पवित्र मानलेली हि देवस्थाने असून यासंदर्भात धर्मादाय विभागाने प्रशासकीय नेमणुकीची भाषा बंद करावी, अन्यथा संपूर्ण हिंदुस्थानातील श्रीराम सेना आणि हिंदू बांधव एकत्रित येऊन आंदोलन करतील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी हि संपूर्णपणे सरकारची असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.