अश्लील व्हिडिओ प्रकरणी राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी विरोधी पक्षाने केलेली मागणी आणि नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय दृष्ट्या हा विषय मिटला आहे. आता पोलीसांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी जलद गतीने तपास करून जे कांही सत्य आहे ते जनतेसमोर आणले पाहिजे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आणि रमेश जारकीहोळी यांचे बंधू आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, अश्लील व्हिडिओ प्रकरणी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष अशा सर्वांनी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार नैतिक जबाबदारी समजून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आमच्या दृष्टीने हा विषय मिटला आहे. नैतिक जबाबदारी समजून त्यांनी राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. आता त्या व्हिडिओसंदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी सध्या पोलीस चौकशीची मागणी केली आहे. तेंव्हा आता पोलीसांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी या संदर्भात जलदगतीने कार्यवाही करून जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आणले पाहिजे.
एखाद्याची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करण्याची ही पहिलीच घटना नाही. या पद्धतीची उदाहरणं आपल्या देशात नवीन नाहीत. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंव्हा काय होईल सांगता येत नाही असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. या प्रकरणात जारकीहोळी कुटुंब आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी असून यापूर्वी देखील मी हे स्पष्ट केले आहे. पक्ष जेंव्हा येतो तेंव्हा आम्ही पक्षास सोबतच असतो. या प्रकरणात पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न होता. त्याच्याशी जारकीहोळी कुटुंबाचा संबंध नाही. हा रमेश जारकीहोळी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये संपूर्ण जारकीहोळी कुटुंबाला गोवणे योग्य नाही. अश्लील व्हिडिओचा प्रकार हा नैतिक प्रश्न होता आणि रमेश जारकीहोळी यांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेंव्हा हा विषय मिटला आहे खरं तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. परंतु त्यांचीही चूक नाही कारण कोणत्याही पक्षाचा नेता असो तो चौकशी आणि तपासातून काय निष्पन्न होते याची वाट पाहत असतो. परंतु उशिरा का होईना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हे उत्तम झाले. आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या हातात काहीही नाही पोलिसांनीच लवकरात लवकर या प्रकरणावर प्रकाश टाकला पाहिजे असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
अश्लील व्हिडिओच्या गौप्य स्फोटानंतर गोकाकमध्ये बंद पुकारण्यात आला, दगडफेक देखील झाली. राजकीय नेत्यांच्या बाबतीत एखादा घोटाळा अथवा स्कॅंडल उघडकीस आले की अशा घटना घडतातच. तेंव्हा हे लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य तो क्रम घ्यावयास हवा होता त्याचप्रमाणे असे प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. असे जारकीहोळी यांनी सांगितले. अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपण आपले बंधू रमेश जारकीहोळी यांना काय सल्ला द्याल? या प्रश्नाला उत्तर देताना प्रसार माध्यम रमेश जारकीहोळी यांना स्पीड गाडी म्हणतात. तेंव्हा आम्ही त्यांना आपल्या राजकीय गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा असे वरचेवर सांगत असतो. एक राजकारणी म्हणून त्यांनी अधिक प्रगल्भ व्हावयास हवे. आपल्यावर लोक लक्ष ठेवून असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे आम्ही सर्व जण त्यांना वारंवार सांगत असतो. त्यांच्यात बदल होणे गरजेचे आहे, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले