कोविड काळात जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी आणि असुविधा चव्हाट्यावर आल्या. जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ नियोजन आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय याबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध कराव्यात, यासाठी नागरिकांनी, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांनी जिल्हा प्रशासनावर निवेदनांचा पाऊस पाडला. परंतु अद्यापही रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच झाले आहे.
बेळगावच्या हेल्प फॉर निडी या संस्थेचे संस्थापक सुरेंद्र अनगोळकर यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात झालेल्या अस्वच्छतेवर प्रकाशझोत टाकला असून या परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जिल्हा रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोविड वॉर्डसमोर मास्क, हॅन्डग्लोव्ज आणि कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी देण्यात आलेल्या वस्तू उघड्यावर टाकून देण्यात आल्या आहेत.
आधीच संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला असून रुग्णालय परिसरातील हा प्रकार धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय रूग्णालय आवारात बऱ्याच ठिकाणी लाईटची सोय नसल्याने रात्रीच्यावेळेस मद्यपींचा वावर देखील वाढला आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक आणि रुग्णालयातील मेडिकल वेस्ट अनेक ठिकाणी असेच पडून आहे.
ऑक्सिजन मास्क, सलाईन बॉटल्स आणि अशा अनेक वापरलेल्या वस्तू या परिसरात आढळून आल्या आहेत. गेल्या वर्षभरात कोविडवर मात करण्यासाठी सरकार धडपड करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड काळात अनेक खाजगी रुग्णालये बंद होती. केवळ अपवाद वगळता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
याकाळात अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास दाखल झाले आहेत. रुग्णालय परिसरात अशापद्धतीने टाकण्यात आलेल्या वस्तूंमुळे पुन्हा रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे सदर बाब लक्षात घेऊन रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाने सफाई मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.