टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि पॅरा टेबल टेनिस प्रमोशन इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या संजीव हम्मण्णावर यांनी पटकाविले आहे.
इंदूर येथे नुकत्याच आयोजित राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेच्या वयस्क पुरुष विभागांमध्ये संजीव हम्मण्णावर यांनी पहिल्या साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी दिल्लीच्या रमेश याला 11-7, 11-9, 11-8 अशा गुणांनी पराभूत केले. त्यानंतर पुढील सामन्यात गुजरातच्या मानूभाई मकवान याच्यावर 11-7, 11-8, 11-7 अशा सेट्सनी एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीमध्ये हम्मण्णावर यांनी उत्तर प्रदेशच्या केशव गुप्ता याला 12 -10, 11-8, 11-7 असे नमविले. अखेर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संजीव हम्मण्णावर यांनी प्रतिस्पर्धी दिल्लीच्या रमेश याला 11- 9, 12 -10, 9 -11,12 -10 (3 -1) असे पराजित करून विजेतेपद हस्तगत केले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते संजीव हम्मण्णावर यांना चषक, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
इंदोर येथील स्पर्धेत देशातील 22 राज्यातील 175 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. कर्नाटकच्या 16 खेळाडूंच्या चमूने या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई केली.
यापूर्वी संजय हम्मण्णावर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 3 रौप्य पदके पटकाविली आहेत. त्याचप्रमाणे याआधी देखील संजीव हम्मण्णावर यांची पॅरा ऑलंपिकसाठी निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी भारताच्या टेबल टेनिस संघाचे कर्णधारपद भूषविले होते.