Thursday, November 28, 2024

/

शुभम शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 belgaum

बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बेळगाव लोकसभा पोट निवडणूक येत्या 17 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सदर अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. तथापि जे कोणी ही निवडणूक लढवू इच्छितात त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे आलो आहोत.

मराठी भाषीक लोकांची गळचेपी आणि एकजूट या माध्यमातून आम्ही ही पोटनिवडणूक लढविणार आहोत. विकासाला समितीने कधीही विरोध केला नाही. त्याचप्रमाणे आजवर बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. त्यामुळे बेळगावचा आजवर जो विकास झाला आहे तो म. ए. समितीच्या माध्यमातून झाला आहे आणि भविष्यातही त्या अनुषंगानेच आम्ही काम करणार आहोत, असे शेळके यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखुरलेल्या मराठी भाषिकांना एका छत्राखाली आणणार का? या प्रश्नाला उत्तर देताना शुभम शेळके म्हणाले की, मुळातच ही एक संधी मराठी माणसांना यावेळी मिळाली आहे आम्ही मराठी माणसांना पर्याय देत आहोत की परक्यांना जवळ करून कांहीही होत नाही. मराठी माणसांचा उपयोग फक्त मतांसाठी केला जातो असे सांगून आता आपल्या माणसांना मत घालण्यासाठी आम्हाला एक पर्याय द्या, अशी मागणी खुद्द जनतेतूनच होऊ लागल्यामुळे आम्ही ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.Shubham nomination

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना हे दोन्ही पक्ष आणि म. ए. समिती कांही वेगळे नाहीत. कारण सीमाप्रश्नी महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष प्रामुख्याने वर्षानुवर्षे समिती सोबत लढा देत आहेत. त्यामुळे सर्वजण मिळूनच अधिकृत उमेदवाराबाबत अंतिम निर्णय घेतील. सध्या जे कोणी इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संबंधितांच्या अंतिम बैठकीनंतर अधिकृत उमेदवार उमेदवाराचे नांव घोषित केले जाईल. त्यानंतर ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते सर्वजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी माहिती देखील शुभम शेळके यांनी दिली.यावेळी श्रीकांत कदम,संतोष कृष्णाचे,सागर पाटील, विनायक कावळे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.