बेळगावच्या बाजारपेठेत शेकडो महिला भाजीपाला ते इतर वस्तूंची विक्री करून पोट भरतात. पण नैसर्गिक विधींसाठी त्यांना हक्काची सोय नाही.
पोट दाबून ठेऊन आणि जागेचा शोध घेऊन आपल्या नैसर्गिक विधी उरकणाऱ्या या महिलांना आता मोकळे होण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. प्रशासनाने लक्ष दिले नसले तरी मैत्री या लेडीज क्लब ने ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी हा क्लब पुढे आला आहे.
पहाटे येऊन संध्याकाळ पर्यंत राबणाऱ्या या महिलांसाठी कांबळी खुट येथे हे स्वच्छतागृह बांधले जाणार असून त्यासाठी निधी जमविण्यात येत आहे. यासाठीच तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.
१४ ते १६ मार्च याकाळात एस जी बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या सेमिनार हॉल मध्ये हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यात पुरस्कार प्राप्त सात चित्रपट दाखविले जाणार आहेत. १६ रोजी अखेरच्या दिवशी शकुंतला देवी या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.
या महोत्सवात भाग घेऊन त्या महिलांसाठी योगदान देण्याची एक संधी सर्वांना आहे. फक्त काहीतरी करूया असे म्हणण्या पेक्षा खरंच काहीतरी करण्याची ही वेळ आहे.
पोटासाठी राबताना शरीरातील घाण पोटात तुंबवून घेत जगणाऱ्या त्या भगिनींना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे हे व्यासपीठ आहे. तेंव्हा सर्वांनीच आणि विशेषतः महिलांनी पुढे यावे असे आवाहन मैत्री लेडीज क्लब ने केले आहे.