दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर परिसरामध्ये देवांचा देव श्री महादेवाचा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरी करण्यात आली. प्रत्येक शिवालयांमध्ये देव दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असल्यामुळे आज संपूर्ण बेळगाव शहर शिवमय झाल्याचे पहावयास मिळाले.
महाशिवरात्रीनिमित्त गर्दी होणार हे लक्षात घेऊन कोरोनामुळे प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन करीत मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवभक्त आज भल्या पहाटेपासून फळे, फुले व पूजा साहित्य घेऊन आपापल्या भागातील मंदिराकडे जाताना दिसत होते. शिव नामाचा जप करणाऱ्या भाविकांनी प्रत्येक मंदिराचा परिसर फुलून गेला होता.
त्याचप्रमाणे बऱ्याच मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी भाविकाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक मंदिराच्या परिसरात पूजा साहित्याची विक्री करणारे स्टॉल मांडण्यात आले होते. शहर परिसरातील मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच रुद्राभिषेक जलाभिषेक पंचाभिषक, होमहवन, महापूजा, आरती आदी धार्मिक विधी सुरू होते. मोठ्याने मंत्रोच्चारांसह सुरू असलेल्या या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर भारावून गेला होता.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आज सकाळी झालेल्या महापूजेचे यजमानपद कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी भूषविले. कपिलेश्वर मंदिरात आज पहाटे 6 वाजता तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत रुद्राभिषेकाचा विधी पार पडला. आज रात्री 9 वाजता कपिलेश्वर मंदिरात महापूजा होणार असून उद्या शुक्रवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी मंदिरातील अग्निहोत्र शाळेत परशुरामांच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे.
कपिलेश्वर मंदिराबरोबरच शहरातील मिलिटरी महादेव मंदिर, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर, आनंदनगर येथील शिवमंदिर, शाहूनगर येथील शिवमंदिर, शहापूर मुक्तिधाम येथील शिवमंदिर, आयोध्यानगर गणेशपूरचे शिवमंदिर तसेच अन्य विविध ठिकाणच्या शिवमंदिरासह तालुक्यातील कणबर्गी, कडोली, मुचंडी, हंडिभडंगनाथ, मुक्तीमठ आदी ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त बहुतांश मंदिर व्यवस्थापनातर्फे धार्मिक कार्यक्रमात व्यतिरिक्त ओम नमः शिवाय जप, राम नाम जप, प्रवचन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे बऱ्याच शिवालयांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आज दुपारी महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्बंधाचे पालन करत महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे.