सांबरा (ता. बेळगाव) येथील भैरीदेव चौक येथे वीज कोसळून नारळाच्या तीन झाडांनी पेट घेतल्याची घटना आज सायंकाळी घडली. मात्र अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.
आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसाचा अंदाज होता. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे आज दुपारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या माऱ्याबरोबच विजा देखील चमकू लागल्या आणि अचानक सांबरा (ता. बेळगाव) येथील भैरीदेव चौक येथे नारळाच्या झाडांवर वीज कोसळली.
परिणामी सदर झाडांनी पेट घेतल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. सामाजिक कार्यकर्ते नागेश देसाई यांनी सदर घटनेची माहिती ताबडतोब सांबरा विमानतळावरील अग्निशामक दलाला दिली.
तेंव्हा एअरपोर्ट असिस्टंट प्रतापराव देसाई लागलीच अग्निशामक पाण्याचा बंब घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर झाडांना लागलेली आग पाण्याचा उंच फवारा सोडून विझविण्यात आली. या नारळाच्या झाडांशेजारी घरे आहेत. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.