पोलिसांसमोर करवेचा हैदोस; शिवसेना रुग्णवाहिका लक्ष्य; काकती येथेही गोंधळ-बेळगावमधील शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करवे आणि इतर कन्नड संघटनांकडून करण्यात येत आहे. विनाकारण गोंधळ माजवून तणाव निर्माण करण्याचा विडा उचललेल्या कन्नड संघटनानी शिवसेना रुग्णवाहिका लक्ष्य केली आहे. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयासमोर उभ्या असलेल्या शिवसेना रुग्णवाहिकेवर मराठी भाषेत असलेली नंबरप्लेट लक्ष्य करत नंबर प्लेटवर काळे फासण्याचा प्रकार केला आहे. कन्नड कार्यकर्त्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला. पोलिस संरक्षण असूनही हा प्रकार घडल्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना कार्यालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकेच्या बोर्डची तोडफोड करण्यात आली असून वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे. जवळपास १० ते १५ जण पोलिस बंदोबस्तात रामलिंग खिंड गल्लीत हजर झाले. पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला, हे विशेष. पोलिसांनी नेहमी प्रमाणेच बघ्याची भूमिका घेतली. आणि पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून पळवून लावले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खडेबाजारचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरु केला आहे. सदर कन्नड कार्यकर्त्यांना रोखण्यास गेलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आणि प्रवीण तेजम यांनाही अडविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान कन्नड कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशीही हुज्जत घातली. यानंतर बराच वेळ वादावादी झाली. सदर प्रकारानंतर सीमाभागातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान संतप्त शिवसेना आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हा भ्याड हल्ल्याचा निषेध करत धर्मवीर संभाजी चौकात दोन तासाहून अधिक काळ रस्ता रोको करत कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
हॉटेल गावकरी येथेही हल्ल्याचा प्रयत्न
काकती येथे असलेल्या हॉटेल गावकरी येथेही काही कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याठिकाणीही काही काळ गोंधळ निर्माण झाला. या दोन्ही प्रकरणानंतर कन्नड रक्षण वेदका , पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मराठी भाषिकांवर होत असलेली दडपशाही या साऱ्या प्रकाराचा संपूर्ण सीमाभागातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.