Friday, December 20, 2024

/

करवेचा मराठीद्वेष आला उफाळून; फलकावरील मराठी मजकुरावर फसले काळे

 belgaum

बेळगाव पोलीस विभाग एका बाजूला शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपड करत आहे, मराठी भाषिकांना कायद्याची समज देत आहे, परंतु पोलिसांच्या देखत दिवसेंदिवस कन्नड दुराभिमान्यांचे बेळगावमध्ये नाहक शांतता भंग करण्याचे कारस्थान सुरु आहे. परंतु अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टीला पोलिसांकडून रोखण्यात येत नाही. किंवा संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात येत नाही. आज बेळगावमध्ये आंबेडकर रोडवरील सरकारी फलकावरील मराठी मजकूर हटविण्याचा केविलवाणा प्रयत्न कन्नड कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे सीमाभागाचे वातावरण तापले आहे.

बुधवारी नावगे या गावी बस वरील नामफलकावर असलेला मराठी मजकूर पुसून टाकण्याचा प्रकार ताजा असतानाच आज पुन्हा बेळगावमध्ये तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र मराठी द्वेष्ट्यांनी केला आहे. बेळगाव शहरातील आंबेडकर रोडवरील सरकारी फलकावरील फक्त मराठी अक्षरात लिहलेल्या ‘कोल्हापूर’ या नावाला कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. करवेच्या एच. शिवरामगौडा गटातील कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यांनी रस्त्यावरील बोर्डवर लिहिलेली मराठीतील अक्षर हटविली. कोल्हापूर जिल्ह्यात दुकानावर कन्नड बोर्ड लावल्यास ते दुकानच बंद पाडण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. बुधवारी (10 मार्च) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बहुतांशी कन्नड हटावचा नारा देत अशा कन्नड बोर्डला काळे फासत ते फाडून टाकले होते. त्याचे पडसाद आता बेळगावात उमटत आहेत.Krv

हा सारा प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखतच घडत होता. सुरुवातीला पोलिसांनी पहिल्यांदा बघ्याची भूमिका घेतली आणि सर्व प्रकार घडून गेल्यानंतर शेवटी काळ्या रंगाची बाटली जप्त केली. शिवरामगौडा गटाच्या वाजिद हिरेकोडी या कार्यकर्त्याने बेळगावमध्ये मराठीचा वापर कुठेही दिसून आल्यास काळ्या शाईचे अभियान हाती घेण्याची दर्पोक्तीही केली आहे. यासोबत कोल्हापूरमध्ये शिवसेनेनेही आक्रमक पाऊल उचलले असून कोल्हापूर शिवसेनेचे संजय पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी व्यावसायिकांना आव्हान दिलं आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाइल कारवाई करण्यात येईल, असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या महामोर्चादरम्यान पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जाचक अटींसहित नोटीस जारी केली. या नोटिशीत कायदा, सुव्यवस्था, शहराची शांतता बिघडविणे यासोबतच कोणत्याही प्रकारच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी कडक शब्दात सूचना दिल्या होत्या.

आज झालेल्या प्रकारामध्ये कन्नड कार्यकर्त्यांनी सरकारी मालमत्तेचेच नुकसान केले आहे. मराठी भाषिकांसाठी करण्यात येणार दुटप्पीपणा हा सर्वांना माहित आहे. परंतु कौतुकास्पद कामगिरी करत जनतेच्या पसंतीस उतरणाऱ्या पोलीस विभागाकडून अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल का? याकडे सर्व मराठी भाषिक जनता आवासून पाहात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.