बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतरित्या फडकावण्यात आलेला लाल -पिवळा ध्वज तात्काळ हटवावा, या मागणीसाठी 8 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालील मराठी भाषिकांच्या मोर्चात कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे तमाम शिवसैनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी दिली आहे.
वारंवार विनंत्या करून देखील बेळगाव महापालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या बेकायदेशीर लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याने संबंधित ध्वज तात्काळ हटवावा या मागणीसाठी 8 मार्च रोजी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चा संदर्भात बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी उपरोक्त माहिती दिली. राष्ट्रध्वजाचा आणि मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारा बेळगाव महापालिकेसमोरील लाल -पिवळा ध्वज कर्नाटक प्रशासनाने त्वरित हटवावा या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक 8 मार्च रोजीच्या बेळगावातील मोर्चामध्ये भगव्या ध्वजासह सहभागी होणार आहेत.
कर्नाटक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या आडकाठीबाबत बोलताना देवणे म्हणाले की, त्या ध्वजासंदर्भातच मागील वेळी आम्हाला बेळगाव -चंदगड सीमेवरील शिनोळी येथे रोखण्यात आले होते. परंतु तरीदेखील आम्ही न डगमगता गनीमीकाव्याने बेळगाव हद्दीत प्रवेश करून भगवा फडकविला होता. आता जर पुन्हा आम्हाला अडविण्याचा प्रयत्न झाला तर मागील वेळेची पुनरावृत्ती होईल. यावेळी बेळगावात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा गनिमीकाव्याने बेळगाव हद्दीत प्रवेश करून आम्ही भगवा फडकवू, असे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी ठामपणे स्पष्ट केले.
देवणे यांनी स्पष्ट केलेल्या या ठाम भुमिकेच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या बेळगावातील आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोल्हापूर -महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या बाबतीत बेळगाव पोलीस कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1338162889874634/