श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीची लगबग सुरू असताना महाद्वार रोड येथील एका घराला आग लागल्याचे समजताच मंदिरातील सेवेकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याची घटना आज सकाळी महाद्वार रोड, मराठा गल्ली येथे घडली.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर दिलीप ताटे यांच्या मालकीचे आहे. महाद्वार रोड क्रॉस नं. 2 मराठा गल्ली येथील ताटे यांच्या राहत्या घराला आज सकाळी 7 सुमारास आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच श्री कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या लगबगीत असणाऱ्या सेवेकर्यांनी हातातील कामे टाकून ताटे यांच्या घराकडे धाव घेतली.
त्याचप्रमाणे युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेऊन मोठ्या धाडसाने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचप्रमाणे एकाने प्रसंगावधान राखून अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. सदर माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
आगीच्या या दुर्घटनेत दिलीप ताटे यांच्या घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य कपडेलत्ते कागदपत्रे सर्व काही जळून खाक झाले आहे. मात्र कपिलेश्वर मंदिराच्या ट्रस्टींनी ताटे कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाऊन संपूर्ण सहकार्य केले.
याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, दौलत जाधव, संजय मंणगूतकर, रमेश देसुरकर, विकास शिंदे, अजित जाधव, अनिल मुतकेकर आदी ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते. त्याचप्रमाणे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. महाशिवरात्रीच्या शुभदिनी हा दुर्दैवी प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
https://www.instagram.com/p/CMRvioHBPqw/?igshid=1nu5hp6r3bbxc