स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील कडोलकर गल्ली येथे नवे पथदीप बसवून सौंदर्यीकरण करण्यात आले असले तरी अलीकडे गेल्या 10 -15 दिवसांपासून सदर पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी शहरातील कडोलकर गल्ली मार्गावर नवे आकर्षक पथदीप बसविण्यात आल्यामुळे हा मार्ग प्रकाशाने उजळून निघाला होता. मात्र वर्षभरानंतर आता येथील पथदीप वारंवार बंद पडण्याचा प्रकार घडू लागला आहे. सध्या गेल्या 10 -15 दिवसांपासून कडोलकर गल्लीतील पथदीप बंद पडले आहेत.
त्यामुळे सायंकाळनंतर रात्री शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांपैकी एक असणाऱ्या या मार्गावर अंधाराचे साम्राज्य असते. पथदीप बंद पडले असल्यामुळे या ठिकाणच्या शोरूम आणि दुकानदारांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. यामुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्य वीजपुरवठा केंद्राकडून वीज पुरवठा झाला नाही म्हणून पथदीप बंद पडले तर कोणाचीच हरकत नाही. परंतु जर जाणून बुजून पथदीप बंद पाडले जात असतील तर याला कोण जबाबदार? असा संतप्त सवाल कडोलकर गल्ली येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
कारण या ठिकाणच्या मीटर आणि फ्युज बॉक्समधील ठराविक फ्यूज काढून टाकण्यात आल्या आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. तेंव्हा स्मार्ट सिटी तसेच हेस्काॅमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडोलकर गल्ली येथील पथदीप पूर्ववत सुरू राहतील याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
Jara patil galli madhe pan karayala. Lava