बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्ट अंतर्गत बेकायदेशीर मद्य, रोकड आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच कारवाई देखील करण्यात येत आहे. आज घटप्रभा चेकपोस्टवर संशयास्पदरित्या रोख रक्कम कारमधून घेऊन जाताना एसएसटी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत ४२.७१ लाख रोख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पुरेशा आणि योग्य कागदपत्रांअभावी हि रोख रक्कम कारमधून घेऊन जाण्यात येत होती. दरम्यान चेकपोस्टवरील एसएसटी पथकाने महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत कारची तपासणी करत सदर रक्कम जप्त केली आहे. मंगसुळी मार्गावरील यरगट्टी मार्गे जाणाऱ्या या कारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गसूची जाहीर केली आहे. या मार्गसूचीच्या अंतर्गत सर्व नियम आणि अटी पाळण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.
परंतु अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या काही गोष्टींची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. घटप्रभा चेकपोस्टवर कार्यरत असलेले उमेश मनगुळी यांच्या नेतृत्वाखालील एसएसटी पथकाने हि कारवाई केली आहे.