गेल्या कांही दिवसापासून बेळगाव शहरातील उष्णतेत वाढ होत असून तापमान बरेच वाढले आहे. आज गुरुवारी बेळगावचा पारा कमाल 34.2 सेल्सियस आणि किमान 17.4 सेल्सिअस इतका होता.
गेल्या कांही दिवसांपासून शहरातील उष्णतेत वाढ होत असून तापमानाचा पारा चढू लागला आहे. सकाळी व रात्रीच्या वेळेत थंडी जाणवत असली तरी दिवसभर उष्णतेत वाढ होत आहे. उकाड्यात वाढ होत असल्याने दिवसभर सर्वत्र पंखांची घरघर पहावयाला मिळत आहे.
त्याचप्रमाणे कार्यालयातून एसीचा वापर वाढला आहे. हिवाळा ऋतू संपला असून उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत आहे. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात होत होती. परिणामी हवेत काहीसा गारवा होता. मात्र आता ढगाळ वातावरण मोकळे झाले असून उष्मात वाढ झाली आहे.
गेल्या कांही दिवसापासून सकाळपासूनच ऊन्ह वाढत असल्यामुळे दुपारपर्यंत नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. या वाढत्या उष्म्यामुळे थंड पेयांची मागणी वाढली असून रस्त्यावरील शहाळे आणि सरबत विक्रेत्यांसह शहरातील कोल्ड्रिंक हाऊस चालकांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.