Friday, December 20, 2024

/

शुद्ध ताज्या हर्बल ज्यूस विक्रीद्वारे “हे” घेतात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

 belgaum

व्याधींना दूर ठेवून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्राचीन -पुरातन काळापासून मनुष्य औषधी वनस्पती, मुळं, कंदमुळांचा रस अर्थात हर्बल ज्युसचा वापर करत आला आहे. आयुर्वेदामध्ये या औषधी रसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेळगावात देखील अशी एक व्यक्ती आहे जी सकाळी फिरावयास जाणाऱ्या मंडळींना शुद्ध ताजा औषधी हर्बल ज्युस देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेते. या व्यक्तीचे नांव आहे विनायक विष्णू गोदे.

शास्त्रीनगर सहावा क्रॉस येथे राहणारे विनायक गोदे शहरातील एका सोसायटीचे कर्मचारी आहेत. दिवसभर सोसायटीमध्ये काम करणारे गोदे दररोज सकाळी हिंदवाडी येथील गोमटेश हायस्कूल कॉर्नरवर बी. टी. पाटील बंगल्यासमोर आपला औषधी वनस्पती, मुळं, कंदमुळांच्या रसांचा म्हणजेच हर्बल ज्युसचा स्टॉल लावतात. मॉर्निंग वॉकला अर्थात सकाळी फिरावयास जाणारी मंडळी भल्या पहाटे घराबाहेर पडत असल्यामुळे गोदे सकाळी 5:15 ते 8 वाजेपर्यंत आपला स्टॉल खुला ठेवतात. त्यांच्या स्टॉलवर पुदिना, कारलं, कडुलिंब, दुधीभोपळा, आवळा, गाजर, बीट आणि गव्हांकूर यांचे ज्युस उपलब्ध असतात.

या सर्व ज्यूसची अवघ्या 10 रुपये प्रति कप इतक्या माफक दरात विक्री केली जाते. मुंबई, पुणे, बेंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये सकाळी फिरावयास जाणाऱ्यांसाठी ठीकठिकाणी हर्बल ज्यूसचे स्टॉल लावलेले असतात. आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग असणारी मंडळी आवर्जून या स्टॉलला भेट देत असतात. यापासून प्रेरणा घेऊन 21 वर्षापूर्वी आपण देखील आपल्या परीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या हेतूने विनायक गोदे यांनी अल्प मोबदल्यात हर्बल ज्यूस विक्रीचा व्यवसाय सुरू केला.Gode

आजकाल बाजारात नामांकित कंपन्यांचे विविध हर्बल ज्यूस उपलब्ध आहेत. मात्र हे ज्युस खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असते. यासाठी ग्राहकांना शुद्ध ताजे हर्बल ज्युस देण्याचा माझा कायम कटाक्ष असतो, असे विनायक गोदे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. यासाठी मी पहाटे 3:30 वाजता उठतो. त्यानंतर गाजर, बीट, कारलं, गव्हांकुर आदी वाटून त्याचा रस अर्थात ज्यूस काढतो. तो निरनिराळ्या बाटल्यांमध्ये भरून सव्वापाच वाजता हिंदवाडीतील गोमटेश हायस्कूलचा कोपरा गाठतो.

आपल्याकडील हर्बल ज्युसबद्दल अधिक माहिती देताना विनायक गोदे म्हणाले की, आवळा ज्यूसमध्ये “सी” व्हिटामीन भरपूर असल्यामुळे तो रोग प्रतिकारक आणि पित्तशामक असतो. तुळस ज्युस सर्दी, खोकला, कफसाठी. पुदिना ज्युस पोटातील गॅस आणि ऍसिडिटीसाठी. गाजर ज्यूसमध्ये व्हिटामीन “ए” असल्यामुळे तो निरोगी डोळ्यांसाठी. बीट ज्यूस कॅल्शिअम आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी. कारलं ज्यूस मधुमेह कमी करण्यासाठी. कडुलिंब ज्यूस उष्णता कमी करण्यासाठी. दुधीभोपळा ज्यूस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याबरोबरच शरीराची स्थूलता आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तर गव्हांकुर ज्यूस शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि कर्करोगासाठी अतिशय परिणामकारक असतो, असे गोदे यांनी स्पष्ट केले.

आपल्या आरोग्याबाबत जागरूक असल्यामुळे म्हणा किंवा विविध व्याधींपासून दूर राहण्यासाठी अथवा झालेल्या व्याधीतून मुक्तता मिळविण्यासाठी बहुसंख्य मंडळी सकाळी फिरायला घराबाहेर पडतात. या मंडळींपैकी सुमारे 150 जण दररोज सकाळी नित्यनेमाने माझ्या स्टॉलला भेट देऊन हर्बल ज्यूसचा लाभ घेतात, अशी माहितीही गोदे यांनी दिली. अर्थांजनाबरोबरच आपल्यापरीने एक समाज सेवा या दृष्टिकोनातून गेली दोन दशके विनायक गोदे या पद्धतीने वनस्पतीचे रस अर्थात हर्बल ज्यूसची अवरित विक्री करत आहेत. ज्यूसची नुसती विक्री न करता नवख्या मंडळींना ते हर्बल ज्यूसची माहिती देण्याबरोबरच त्याचे महत्वही पटवून देत असतात. या कार्याची दखल घेऊन वर्षभरापूर्वी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने आपल्या खास समारंभात विनायक गोदे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. थोडक्यात सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता आरोग्यवर्धक शुद्ध ताज्या हर्बल ज्यूससाठी नागरिकांनी विनायक गोदे (मो. क्र. 9972137088) यांच्या स्टॉलला दररोज नाही तर किमान आठवड्यातून एकदा तरी भेट द्यायला काहीच हरकत नाही.

– महेश सुभेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.