कोविड परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची माहिती पुढे येत असतानाच पुन्हा एकदा बंगळूर शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. एकदिवसात तब्बल ४०००० जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.
सोमवारपासून ३००० सरकारी केंद्र स्थापण्यात येणार असून दररोज दीड लाख लोकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. यासोबतच बेळगाव जिल्ह्यातही कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून दक्षता घेण्याची गरज असल्याची सूचना आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्येही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जवळपास ३००० लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविड परिस्थितीसंदर्भात आयोजिण्यात आलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. लसीकरण मोहिमेचा लाभ अधिकाधिक जनतेने घ्यावा असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.
प्रत्येक आठवड्यात २०० ते २५० कोविड रुग्ण आढळून येत होते. परंतु शुक्रवारच्या कोविड आढाव्यानुसार कोविड रुग्णांची संख्या अचानक ४०० वर गेली आहे. याचप्रमाणे दररोज ३०००० चाचण्या करण्यात येत होत्या त्याठिकाणी अचानक वाढ होऊन ४०००० चाचण्या झाल्या आहेत, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून केंद्राच्या माध्यमातून निदर्शनास आलेल्या कोविड रुग्णांच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या २० जणांना कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आले असून त्या सर्वांच्या कोविड चाचण्याही करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे कर्नाटकातही आव्हानात्मक परिस्थितीतही उद्भवली असून राज्याच्या सीमेवर कडक निगराणी तसेच यासंदर्भातील सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले. ५०० हुन अधिक लोकांसोबत मेळावा, किंवा इतर कार्यक्रम होऊ नयेत, यासाठी पोलीस विभागाशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील ज्या जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या अधिक असेल, त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेणार असून बंगळूर अर्बन, दक्षिण कन्नड, म्हैसूर, चामराजनगर, उडुपी, कोडुगु, बेळगाव आणि तुमकूर याठिकाणी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.