बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमेवरील चेकपोस्ट आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केली. गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या चेकपोस्टला भेट देऊन तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गोवा, महाराष्ट्र आणि आता राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची व्यवस्थित तपासणी करावी, असे आदेश चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बेकायदेशीर रित्या वाहतूक होणारे मद्य, रोखरक्कम आणि इतर वस्तू आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारी बाची, बेककिंकेरे, राकसकोप, संतीबस्तवाड क्रॉस, देसूर क्रॉस, खानापूर मार्ग यासह अनेक ठिकाणी असलेल्या सीमेवरील चेकपोस्टवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे अनेक मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. पिण्याचे पाणी , विजेची व्यवस्था, शौचालय यासह निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली.
या पाहणीदौऱ्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांच्यासह ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे निवडणूक अधिकारी शिवनगौडा पाटील, तहसीलदार कुलकर्णी आणि इतर उपस्थित होते.