कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे बेळगाव शहरातील अनगोळ आणि विश्वेश्वरय्यानगर याठिकाणांसह जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी जिल्हाधिकार्यांनी ‘मायक्रो कंटेन्मेट झोन’ जाहीर केले आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशानुसार काल गुरुवारी 18 मार्च रोजी शहरात दोन कंटेन्मेट झोन तयार केल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
विश्वेश्वरय्यानगर येथील संपिगे रोडवर एकाच ठिकाणी 8 कोरोना बाधित सापडल्याने तर अनगोळ येथील आंबेडकरनगर व शिवशक्तीनगर असे मिळून 4 कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कंटेन्मेट झोन तयार करण्यात आला आहे. विश्वेश्वरय्यानगर येथील तीन कुटुंबातील सदस्य कांही दिवसांपूर्वी राजस्थान येथे गेले होते. तेथून परत आल्यानंतर एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी सर्वांची चांचणी घेतली असता त्यात 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यानुसार संपिगे रोड येथील कंटेन्मेट झोन गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांनी या मायक्रो कंटेन्मेट झोनची घोषणा केली आहे. अनगोळ येथील कंटेन्मेट झोन गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्या ठिकाणी बॅरिकेटडस् व प्लास्टिक पट्ट्या बांधून झोन तयार केला गेला आहे. याशिवाय संपिगे रोड आणि अनगोळ येथील संबंधित परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने तेथे कंटेन्मेट झोनचा फलकही लावण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बुवाची सौंदत्ती व कोळची मदकवी येथे देखील मायक्रो कंटेन्मेट झोन जाहीर करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी बुवाची सौंदत्ती येथे एकाच कुटुंबातील 19 जणांना कोरोनाची लागण झाली होती. सांगली येथे अंत्यसंस्काराला जाऊन आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोरोना लागण झाल्याचे उघडकीस आले होते.
बिल्डिंगमध्ये किंवा एकाच ठिकाणी पाच किंवा अधिक कोरोना बाधित रुग्ण असतील तर ती बिल्डिंग मायक्रो कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी कोरोना रुग्ण आढळला की बिल्डिंग सील केली जात होती. पण आता नवीन नियमानुसार बिल्डिंग सील केली जाणार नाही. फक्त त्या बिल्डींगमधील रहिवाशांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच त्या भागातील दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.