केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द व्हावा या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेतर्फे आज सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाड्यांसह भव्य मोर्चा काढण्यात आला.
कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेतर्फे आज सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे छेडलेल्या धरणे सत्याग्रहामुळे या ठिकाणची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. धरणे सत्याग्रहानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. त्यामुळे हा मोर्चा सार्यांचे लक्ष वेधून घेत होता.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे संचालक गणेश इळीगेर,जिल्हा अध्यक्ष सत्यपाल मल्लापुरे, उपाध्यक्ष रमेश मडिवाळ, तालुका अध्यक्ष राजू मरवे, कित्तूर तालुका अध्यक्ष कुबेर गाणगेर, मुत्तेप्पा बागन्नावर, एस. एम. बिळ्ळूर, रवी पट्टेगार, मंजू मरगौडर, महांतेश हिरेमठ आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलना अंती जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास ताबडतोब रद्द करुन प्राणपणाने लढणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसह विद्युत खासगीकरण रद्द करावे, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतकऱ्यांची प्रलंबित ऊस बिले त्वरित अदा केली जावीत, कर्नाटक विकास ग्रामीण बँकेकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास थांबवावा आदी मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.
सदर मोर्चा व धरणे सत्याग्रहाच्या आंदोलनात अथणी, गोकाक, बैलहोंगल, चिक्कोडी, कित्तूर, रायबाग येथील शेतकरी देखील बहुसंख्येने सहभागी झाले होते. धरणे आणि मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.