“एक मराठा लाख मराठा” टी-शर्ट विक्री प्रकरण खटल्याच्या आज येथील जेएमएफसी तृतीय न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीप्रसंगी चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. या खटल्याची पुढील तारीख 6 एप्रिल पडली आहे.
गेल्या 1 नोव्हेंबर 2017 रोजी काळ्या दिनी रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेससमोर “एक मराठा लाख मराठा”, “मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे” असे छापलेल्या टी-शर्टची विक्री करणाऱ्या कोल्हापूर येथील शहाजीराजे भोसले यांना खडेबाजार पोलिसांनी अटक केली होती. त्याचप्रमाणे त्यांना आठ दिवस कारागृहात ठेवले होते. सरकार विरोधी कारस्थान करणे, कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे आदी आरोप ठेवून भोसले यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
शहाजीराजे भोसले यांना सदर टी -शर्ट्सची विक्री करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. भोसले यांच्या प्रमाणेच त्यांच्यावरही आरोपपत्र दाखल केले आहे.
या खटल्याची आज बेळगाव जेएमएफसी तृतीय न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपींवरील दोषारोपण अर्थात चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. आता सदर खटल्याची पुढील सुनावणी येत्या 6 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. त्यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची म्हणजेच फिर्यादींची साक्ष होणार आहे. आरोपीतर्फे ॲड. महेश बिर्जे काम पहात आहेत.