शहापूर येथील प्रभाग क्रमांक 20 मधील कोरे गल्ली व जेड गल्ली या ठिकाणची ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्यामुळे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे येथील विहिरींचे पाणी दूषित होऊन पाण्याला दुर्गंधी येत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात ठीकठिकाणी विहिरींच्या पाण्यात ड्रेनेज मिश्रित पाणी मिसळल्याने विहिरी दूषित होत चालल्या आहेत. ड्रेनेज मिश्रित पाणी विहिरीत जात असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कांही भागात नागरिकांना उलटी -जुलाब यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहापूर वॉर्ड क्रमांक 20 मधील कोरे गल्ली आणि जेड गल्ली येथील ड्रेनेज पाईपलाईन तुंबली असून सांडपाणी नजीकच्या विहिरीमध्ये झिरपत आहे. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू असून ड्रेनेजमधील सांडपाण्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. येथील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने ही समस्या उद्भवली असून सकिंग मशीनद्वारे संपूर्ण ड्रेनेज स्वच्छ करावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
कोरे गल्ली आणि जेड गल्ली यांच्यामध्ये तीन वर्षापूर्वी नवीन ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या पाइपलाइनच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यांपासून सदर ड्रेनेज पाईपलाईन तुंबण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यापूर्वी तक्रार केल्यानंतर महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी येऊन थोडीफार साफसफाई करून जात होते. मात्र गेल्या एक महिन्यापासून तक्रार करून देखील या तुंबलेल्या ड्रेनेजकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रेनेजमधील सांडपाणी आसपासच्या विहिरीत झिरपत आहे. यामुळे या भागातील जवळपास सात-आठ विहीरींचे पाणी दूषित झाले आहे
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. या भागात तीन-चार दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. तेंव्हा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ड्रेनेज पाईपलाईन तात्काळ स्वच्छ करण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक अभी मजुकर यांनी तुंबलेल्या ड्रेनेजसंदर्भातील फोटो, विहिरीच्या दूषित झालेल्या पाण्याचे फोटो आज मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्तांना पाठविले आहेत. तेंव्हा आयुक्तांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत अन्यथा आम्हाला नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.