कणबर्गी टेकडीवरील श्री सिद्धेश्वर देवळानजीकच्या जंगल परिसरात राष्ट्रीय स्तरावरील पक्षिधामाची निर्मिती करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, ॲड. एन. आर. लातूर आणि पक्षीप्रेमींनी केली आहे.
भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम येथे लघु प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अलीकडेच वाघ-सिंह असे प्राणी आणण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्य प्राण्यांचेही या ठिकाणी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या उत्तर भागात पक्षीधाम देखील स्थापन केले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहरात नजीकचा बहुतांश प्रदेश निसर्गाने समृद्ध आहे. या ठिकाणी विविध पक्षांचे वास्तव्य आहे. याव्यतिरिक्त दरवर्षी हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये विविध प्रजातींच्या पक्षांचे बेळगाव शहर परिसरात आगमन होत असते. हे पक्षी ठराविक काळापर्यंत बेळगावात वास्तव्य करून पुढील प्रवासाला निघून जातात. या सर्व बाबी ध्यानात घेऊन बेळगाव उत्तर भागामध्ये पक्षीधाम व्हावे, अशी मागणी वाढू लागली आहे.
पक्षिधामाच्या निर्मिती संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर आणि ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखालील पक्षी प्रेमींच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
कणबर्गी हे गाव निसर्ग संपन्न आहे. या ठिकाणच्या डोंगर भागात अनेक पक्षी बागडत असतात. येथील नैसर्गिक अधिवासात पक्षी धाम उभारणे शक्य आहे. तेंव्हा याबाबत सरकारने जरूर विचार करावा आणि राष्ट्रीय दर्जाचे पक्षीधाम या ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.