राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यास नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) जारी करण्याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याचे मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले आहे.
कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस हळूहळू तीव्र होत आहे. त्यामुळे आगामी दिवसात कठोर उपाययोजना हाती घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. सुधाकर यांनी काल शुक्रवारी बेंगलोर विधान सौध येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात दिवसभरात सरासरी 1000 पेक्षा अधिक कोरोना ग्रस्त रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून भविष्यात कठोर उपाययोजना करण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार चालविला आहे.
दररोज 1,500 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) लागू करण्याचा सल्ला तांत्रिक सल्लागार समितीने दिला आहे. त्यामुळे या विषयी पुन्हा एकदा बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येईल असेही आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले आहे.