बेळगाव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने कोरोना लसीकरणाचे काम तातडीने करण्यासाठी पावले उचलली जात असून यासाठी जिल्ह्यात 180 सरकारी आणि 51 खाजगी ठिकाणी अशी एकूण 231 कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी दिली.
गेल्या कांही दिवसांपासून महाराष्ट्र व केरळ राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उच्चांकी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा कर्नाटकात फैलाव होऊ नये यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्या नागरिकांना आरटी -पीसीआर चांचणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहितीही मुन्याळ यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचे काम तातडीने करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. यासाठी जिल्ह्यात 180 सरकारी आणि 51 खाजगी ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शिवाय कोरोना तपासणीही वेगाने होत असून नागरिकांनी सुरक्षित राहण्याकरता सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाचे रुग्ण नजीकच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. याची दखल घेत कर्नाटक -महाराष्ट्र राज्य मार्गावर तपासणी नाके सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
नागरिक व प्रवाशांनीही आपल्यामध्ये कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत असल्यास त्वरित आरोग्य विभागाची संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी केले आहे.