Saturday, December 21, 2024

/

*सीडी प्रकरण : संशयितांना मिळाले होते पैसे -एसआयटी

 belgaum

अश्लिल सीडी प्रकरणातील संशयित 8 जणांच्या बँक खात्यामध्ये लाखो रुपये जमा झाले असल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासामध्ये उघडकीस आले आहे. दरम्यान अपहृत महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीचे सीबीआय रोड येथील तिच्या घरातून अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.

अश्लील सीडी प्रकरणाशी संबंधित बेपत्ता महिलेच्या बेळगाव येथील वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची नोंदविलेली तक्रार गुरुवारी आरटी नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. आरटी नगर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतल्यानंतर आता हे प्रकरण एसआयटीकडे हस्तांतरित केले आहे. सध्या तपासकार्य सुरू असल्यामुळे आम्ही कोणतीही माहिती उघड करू शकत नाही.

आम्ही त्या फरारी झालेल्या संशयित दांपत्याचा शोध घेत असून अन्य कांही जणांची चौकशी सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) पथकाने अपहरण झाल्याचा आरोप असलेल्या संबंधित महिलेच्या आरटी नगर येथील घराची झडती घेतली असता कांही किंमती वस्तू आढळून आल्या असून त्यामध्ये रोख रकमेसह सिम कार्ड आणि गॅजेट्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बसवेश्वरनगर येथील आणखी एका संशयिताच्या घराची झडती घेतली असता याचा एसआयटी पथकाला 18 लाख रुपये किमतीचे सोने खरेदी केल्याची पावती, एक लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडले आहे. मात्र ज्या संपादित न झालेल्या (अनएडिटेड) अश्लील सीडीचा ते शोध घेत होते ती सीडी मात्र एसआयटी अधिकाऱ्यांना मिळू शकली नाही.

*आपल्याला गोवले जात आहे*

दरम्यान, सदर अश्लिल सीडी प्रकरणातील प्रमुख संशयित नरेश गौडा याने आपल्याला विनाकारण लक्ष्य करून या प्रकरणात गोवले जात असल्याचे विधान करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आता आठवडाभरानंतर त्याने एसआयटी समोर हजर होऊन आपली जबानी देण्याचे मान्य केले आहे. त्या सीडीतील महिलेला मी ओळखतो आणि एक-दोन वेळा ती माझ्या घरी देखील आली होती. रमेश जारकीहोळी हे मला लक्ष्य करत असून सदर प्रकरणात मला गोवण्यासाठी एसआयटीवर दबाव आणत आहेत. मी माझ्या सर्व बँक खात्यांचा तपशील एसआयटीला देण्यास तयार आहे. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. आज देखील काढलेल्या कर्जाचा दरमहा 15 हजार रुपये हप्ता मी भरत आहे, असे नरेश गौडा याने आपल्या व्हिडिओत म्हंटले आहे.

मी एका न्यूज चॅनेलमध्ये काम करत असल्यामुळे संबंधित महिलेने माझ्याकडे मदतीची मागणी केली होती. आपला जीव धोक्यात असल्याचे सांगून तिने मला त्या सीडीबद्दल सांगितले होते. तेंव्हा प्रकरण उजेडात आणायचे असेल तर मला योग्य पुरावे दे, असे मी तिला सांगितले होते आणि तिने तसे पुरावे देण्याचे मान्यही केले होते. तथापि त्यानंतर ती परत भेटायला आलीच नाही. माझं नांव या प्रकरणात गोवले गेले असल्याचे समजताच संभाव्य धोका लक्षात घेऊन मी शहरापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असेही गौडा याने आपल्या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.

*जारकीहोळींविरुद्ध एफआयआर दाखल करावे*
दरम्यान, बेळगावचे आरटीआय कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी गुरुवारी बेंगलोरमधील कब्बन पार्क पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार नोंदवून जारकीहोळी यांच्याविरुद्ध पोलिसांनी तात्काळ सुमोटो एफआयआर दाखल करावे अशी मागणी केली आहे. येत्या 24 तासात जारकीहोळी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावे अन्यथा मी एफआयआर दाखल करून घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करेन, असे आवाहन आपण पोलिसांना केले असल्याचे भिमाप्पा गडाद यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले आहे.

अश्लिल सीडी प्रकरणात जे खरे ‘आरोपी’ आहेत त्या जारकीहोळी यांनी लिहिलेल्या पत्रावरून सरकारने याप्रकरणी एसआयटीची स्थापना केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला न्याय मिळावा म्हणून जे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांवर पोलीस विविध सुमोटो गुन्हे दाखल करत आहेत, तर मग त्याचे अनुकरण पोलीस अश्लिल सीडी सारख्या गंभीर प्रकरणात का करू शकत नाहीत? असा सवालही गडाद त्यांनी केला आहे. आरोपीविरुद्ध एसआयटीकडून जेंव्हा एफआयआर दाखल होईल आणि जे लोक या प्रकरणात गुंतले आहेत त्यांना उजेडात आणले जाईल. तेंव्हाच या सीडी प्रकरणावर तर्कशुद्ध पडदा पडेल, असे आरटीआय कार्यकर्ता भिमप्पा गडाद यांना वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.