जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भातील अश्लील सीडी प्रकरण बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मोठे वादळ आले असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्यामुळे पक्षाला कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा सुपूर्द केला आहे. यानंतर रमेश जारकीहोळी यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांनी आपल्या भावाविरोधात केलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
रमेश जारकीहोळी यांचे बंधू आणि कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्या सीडी प्रकरणासंदर्भात चर्चा केली आहे.
रमेश जारकीहोळी यांच्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले असून सदर प्रकरणी मानहानीचा दावाही दाखल करण्यात येणार असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. या खोट्या सीडी प्रकरणाची सीबीआय वा सीआयडी चौकशी करण्यात विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना भालचंद्र जारकीहोळी यांनी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
सीडी प्रकरणासंदर्भात घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, रमेश जारकीहोळी हे मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. कोणाच्याही तक्रारीवरुन राजीनामा देणे योग्य नाही.
ही सीडी कोणी बनविली?,ती महिला कोण आहे?, यामागे कोण राजकारणी आहेत, कि जाणूनबुजून करण्यात आलेले हे कटकारस्थान आहे याची माहिती राज्यातील जनतेला मिळाली पाहिजे. हे राजकीय षड्यंत असून हे सर्व प्रकरण खोटे आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, जर रमेश चुकला असेल तर मी त्याला राज्यातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करण्यास आणि राजकारण सोडण्यास सांगेन, असे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले.