माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या रासलिलेच्या सीडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बेळगावात दाखल झालेल्या उपपोलिस प्रमुख नागराज यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (एसआयटी) अद्याप काहीच हाती न लागल्यामुळे निराशा झाली आहे.
अश्लील सीडी प्रकरणाशी संबंधित बेपत्ता महिलेच्या बेळगाव येथील वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ही तक्रार गुरुवारी बेंगलोरच्या आरटी नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती.
आरटी नगर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतल्यानंतर आता हे प्रकरण एसआयटीकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे चौकशीसाठी एसआयटी पथकाचे बेळगावमध्ये आगमन झाले आहे. अश्लिल सीडी प्रकरणातील बेपत्ता महिलेचे प्रकरण तसेच संबंधित अन्य बाबींसंदर्भात या पथकाने तपास कार्य हाती घेतले आहे.
या तपासकार्यात आत्तापर्यंत तरी एसआयटी पथकाच्या हाती दिलासादायक असे कांहीच लागलेले नाही. ती महिला ज्या घरात राहत होती त्या हनुमाननगर येथील घराला भेट देऊन एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी घर मालकाकडे चौकशी केली आहे.
त्या महिलेच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत? किती वर्षापासून ते इथे राहतात? आदी माहिती यावेळी विचारण्यात आल्याचे समजते. तेंव्हा संबंधित संत्रस्त कुटुंब तीन दिवसापासून घरी परतलेले नाही. ते कोठे गेले आहेत याची मला कल्पना नाही. ते जेंव्हा घरी परत येतील तेव्हाच ते कोठे गेले होते याची माहिती मिळू शकेल, असे घरमालकाने एसआयटी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते.