सालाबाद प्रमाणे शहरातील मराठा युवक संघातर्फे येत्या 26 मार्च 2021 रोजी मराठा मंदिर येथे “बेळगाव श्री” ही मानाची शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
मराठा युवक संघाच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये यंदाच्या 55 व्या बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन 26 रोजी करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.
ही शरीरसौष्ठव स्पर्धा भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या (आयबीबीएफ) नियमानुसार 55 किलो, 60, 65, 70, 75, 80, 85 आणि 85 किलो वरील अशा वजनी गटात घेण्यात येणार आहे. या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार रुपये, 4 हजार, 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार रुपयांची रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
बेळगाव श्री किताब विजेत्याला 15 हजार रुपये रोख, मानाचा किताब, प्रमाणपत्र आणि आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट पोझरला 5 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व चषक देण्यात येईल. या व्यतिरिक्त सांघिक विजेत्याला 5 हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. कै. एस. के. सिद्धण्णावर यांच्या स्मरणार्थ बेळगाव श्री किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटुला फिरता चषक ईश्वर सिद्धण्णावर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
मराठा युवक संघाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीस कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, अजित सिद्धण्णावर, नारायण किटवाडकर, शिवाजी हंगीरगेकर, श्रीकांत देसाई, सुहास किल्लेकर, दिनकर घोरपडे, सुनील अष्टेकर, नेताजी जाधव आदी उपस्थित होते.