बेळगावच्या रिंग रोड निर्मितीसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात 140 कोटी रुपये अनुदानाची तरतूद केली आहे. सदर रिंग रोडसाठी अनुदान मंजूर करून कामाला सुरुवात केली जावी यासाठी दिल्ली येथील कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर आणि अन्य ज्येष्ठ वकिलांनी दिली.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी उपरोक्त माहिती दिली. गेल्या 10 फेब्रुवारी रोजी बेळगावच्या वकिलांनी शंकरगौडा पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेऊन बेळगाव रिंग रोड संदर्भात निवेदन सादर केले होते. बेळगावच्या जनतेची सातत्यपूर्ण मागणी आणि शंकरगौडा पाटील हे सुमारे दशकभरापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून अर्थसंकल्पात रिंग रोडसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आला आहे.
बेळगावसाठी रिंग रोड व्हावा यासाठी 2008 पासून शंकरगौडा पाटील आंदोलनाद्वारे आवाज उठवत होते. त्यांच्या या प्रयत्नांना आता 2021 मध्ये यश आले आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सदर रिंग रोडच्या निर्मितीमुळे बेळगाव शहरातून होणारी धोकादायक अवजड वाहतूक थांबण्याबरोबरच शहराच्या व्यापार उद्योग तसेच अनेक क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होणार आहे. हा रिंग रोड व्हावा अशी समस्त बेळगाववासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासंदर्भात अलीकडे शंकरगौडा पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून बेळगावातील रिंग रोडचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना पटवून दिले आणि रिंग रोडचे काम सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
दरम्यान गेल्या 10 फेब्रुवारी 2021 रोजी बेळगावच्या जेष्ठ वकिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रिंग रोड बाबतचे निवेदन सादर केले होते. यासाठी बेळगावच्या वकिलांना मुख्यमंत्र्यांचे सचिव गिरीष होसूर यांचे देखील सहकार्य लाभले होते. वकिलांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बेळगाव रिंग रोडच्या कामाला सुरुवात व्हावी यासाठी यावेळेच्या अर्थसंकल्पात 140 कोटी रुपयांची तरतूद केली आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
तसेच रिंग रोडसाठी निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना बेळगावच्या जनतेच्यावतीने यावेळी धन्यवाद देण्यात आले. पत्रकार परिषदेस कामगार नेते ॲड. एन. आर. लातूर यांच्यासह ज्येष्ठ वकील ॲड. सी. टी. मजली, ॲड. एस. बी. पुजार, ॲड. एस. कीवडसन्नावर, ॲड. विजय पाटील, उद्योजक उमेश शर्मा, मल्लिकार्जुन बहद्दूरी आदी उपस्थित होते.