बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारकांनी आपली शस्त्रे जवळच्या पोलीस स्थानकात जमा करण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. शस्त्रे जमा केली नाहीत तर संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवडणुकीच्या काळात बंदूक किंवा इतर शस्त्रे घेऊन फिरल्यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असते. निवडणुकीच्या काळात शांततेला धक्का पोहचू नये याची काळजी घेणे गरजेचे असते.
त्यामुळे परवानाधारकांनी आपल्याजवळील बंदुका, पिस्तूल व इतर शस्त्रे नजीकच्या पोलीस स्थानकात जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सेक्युरिटी एजन्सी किंवा कोणत्याही संस्थेत सेक्युरिटी सेवा देणारे गार्ड, गनमॅन आदिंना जिल्हा पातळीवरील स्क्रिनिंग कमिटीकडे अर्ज करून या प्रक्रियेतून सूट मिळवता येते.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे स्क्रिनिंग कमिटीची अध्यक्ष आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, एसीपी एन. व्ही. बरमणी हे स्क्रिनिंग कमिटीचे सदस्य आहेत.