बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हे दिसू लागली असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात 51 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते पुन्हा सतर्क झाले आहे.
कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाल्यामुळे गेल्या 3 -4 महिन्यांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस नगण्य होत चालली होती. मात्र अलीकडे भारतासह जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या धोकादायक लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने सावधगिरीचा आणि खबरदारीचा इशारा दिला जात आहे.
ज्या राज्यात कोरोनाची स्थिती पुन्हा बिघडली आहे, त्या राज्यांसह इतर राज्यांनी देखील कोरोनाविषाणूची दुसरी लाट थोपविण्यासाठी त्वरेने उपाययोजना कराव्यात. अन्यथा गंभीर परिणाम संभवतात, असा स्पष्ट इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 51 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. नव्याने आढळलेल्या सदर कोरोनाबाधितांमध्ये सदाशिवनगर येथील 7 जणांसह बेळगाव शहरातील एकूण 18 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नव्याने आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक 20 रुग्ण रामदुर्ग तालुक्यातील आहेत.
अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून आल्यामुळे ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते पुन्हा सतर्क झाले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी कोरोना संदर्भातील सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझेशन आधी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.