गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते, त्या पोटनिवडणूकांची तारीख एकदाची जाहीर झाली. आणि तारीख जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी आणि तत्पूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी धांदल सुरु झाली आहे. राष्ट्रीय पक्षांकडे अधिकृतपणे उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मनधरणी सुरु झाली आहे.
बेळगावचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापत असून बहुचर्चित भाजप उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. डॉ. रवी पाटील, किरण जाधव, महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, डॉ. सोनवलकर, बैलहोंगलचे माजी आमदार विश्वनाथ पाटील यांच्यासह असंख्य उमेदवार राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी रांगेत आहेत.
काँग्रेस पक्षामधून देखील अनेक इच्छुक उमेदवार स्पर्धेत असून भाजपच्या उमेदवाराचे नाव घोषित झाल्यानंतर तात्काळ काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नवलगट्टी यांच्यासह अनेकांची लॉबी कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी किंवा ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना देखील उमेदवारी मिळू शकते.
भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांसह शेकडो उमेदवार रांगेत आहेत. अनेक उमेदवारांनी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दिल्ली येथील वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यासाठी धाव घेतली असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आता या नंतर उमेदवाराच्या नावावर शिक्कमोर्तब, अर्ज भरणे, प्रचार ते निवडणूक आणि मतमोजणी पर्यंत बेळगावच्या राजकीय वातावरणाचा अंदाज लावणे कठीण आहे. प्रशासनाने हि निवडणूक उत्तमरीत्या आणि कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावी, यासाठी अनेक पथके, कंट्रोल रूम आणि इतर सुविधा करण्यात आल्या आहेत.