दहा लाखाहून जास्त आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या उत्तम राहणीमान असणाऱ्या शहरांच्या मूल्यांकनावरून तयार करण्यात आलेल्या सूचीनुसार 2020 सालच्या शहरांच्या मानांकनामध्ये बेळगाव शहर 10 लाखाहून कमी लोकसंख्येच्या विभागात 47 व्या क्रमांकावर असून बेळगाव पालिकेचे मानांकन 33 वे आहे.
राहणीमानावरून ठराविक कालावधीनंतर देशातील शहरांची मानांकने ठरविली जातात. दहा लाखाहून अधिक आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असणारी शहरे अशा दोन विभागांमध्ये ही मानांकने निश्चित केली जातात. यासाठी जे मूल्यांकन केले जाते त्यामध्ये देशातील 111 शहरांचा सहभाग असतो. गेल्या 2018 सालच्या या मूल्यांकनात राहणीमानाच्या बाबतीत बेळगाव 52 व्या क्रमांकावर होते.
2020 सालच्या राहणीमानाच्या मूल्यांकन सूचीमध्ये बेंगळूर शहर 10 लाखावर लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या विभागात देशात प्रथम क्रमांकावर आहे. बेंगलोर खालोखाल अनुक्रमे पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईमतुर, वडोदरा, इंदोर आणि ग्रेटर मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो.
उत्तम राहणीमानाच्या 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या विभागात सिमला अग्रस्थानी असून त्याखालोखाल अनुक्रमे भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनडा, सालेम, वेल्लोर, गांधिनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि त्रिचनापल्ली यांचा क्रमांक लागतो. या विभागात बेळगाव 47 व्या क्रमांकावर आहे.