लोकसभा पोटनिवडणूक प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात होणार आहे. परंतु अद्याप राष्ट्रीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा २५ मार्च किंवा २६ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. बेळगावमधील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते.
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. उमेद्वारासंदर्भात अद्याप हायकमांड निर्णय घेत आहे. हायकमांडच्या झालेल्या बैठकीत तीन नावांची शिफारस करण्यात आली असून पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढवेन. पक्षाच्या भल्यासाठीच माझ्या नावाची शिफारस करण्यात आली असेल, असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले.
मंगळवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे प्रयाण करणार असून काही विषयांवर पक्ष वरिष्ठांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ किंवा २६ मार्च रोजी अधिकृत उमेदवार घोषित केला जाण्याची शक्यता असल्याचे मत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
उमेदवारी जाहीर झाली कि त्यानंतर यमकनमर्डी मतदार संघात बैठक घेऊन, अभिप्राय घेऊन विचार कारेन. काँग्रेस पक्षासाठी ‘प्लस मायनस पॉईंट्स’ कोणते आहेत, यासंदर्भात मतदारांशी चर्चा करेन.
मतदार माझ्यासोबत असतील. त्यांची काहीच हरकत नसेल,असा विश्वास सतीश जारकीहोळींनी व्यक्त केला. रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले कि, याविषयी पोलीस तपस घेत आहेत. आज ना उद्या तपस होईल. सत्य उजेडात येईल. सीडी प्रकरणानंतर रमेश जारकीहोळी आणि माझे बोलणे झाले नाही. उद्या बंगळूरला जाण्यापूर्वी त्यांची भेट घेईन, असे सतीश जारकीहोळींनी पत्रकारांना सांगितले.