बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या येत्या 17 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने ए-बी फॉर्म जाहीर केला असून अद्याप उमेदवार निश्चित व्हावयाचा आहे.
बेळगाव शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने आज शनिवारी मुंबई मुक्कामी शिवसेनेचे सेक्रेटरी राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी बी फॉर्मची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन शिवसेनेने बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी ए-बी फॉर्म जाहीर केला आहे. दरम्यान, सदर शिष्टमंडळाने सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली.
या भेटीप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्याशी शिंदे यांनी दूरध्वनी वर चर्चा केली. याचप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समिती व आणि शिवसेनेने संयुक्तरीत्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढवावी असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दळवी यांना सुुचित केले.
आता यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समिती आणि घटक समित्यांच्या बैठका होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळात अरविंद नागनुरी, प्रकाश शिरोळकर,दत्ता जाधव ,सचिन गोरले उपस्थित होते.