बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजले असून बेळगावमधील राष्ट्रीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये, अशी मागणी बेळगावमधील मराठी भाषिक जनता, युवा कार्यकर्ते आणि युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडिया ट्रेंड वाढत चालला आहे. जो ट्रेंड सोशल मीडियावर असेल तोच ट्रेंड वास्तवात देखील पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील नेत्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थिती दर्शवू नये, असे आवाहन आणि सूचना सीमाभागातील मराठी भाषिक युवक आणि युवा समितीने केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागातील मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि भाषा संवर्धनासाठी निवडणूक लढवते. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सुटावा आणि बहुसंख्य मराठी भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी लढाही सुरु आहे.
महाराष्ट्राचीही तशीच अपेक्षा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नेतेमंडळी आहेत, असे नेहमीच सांगितले जाते. परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय पक्षांची भूमिका बदलते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते प्रचार सभा घेतात. यामुळे मराठी मतांची विभागणी होते.
निवडणुकीदरम्यान पक्षांची भूमिका वेगळी आणि इतर वेळी वेगळी असे समीकरण झाले आहे. यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी बेळगावमध्ये प्रचारासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सहभाग घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभेला उपस्थिती दर्शविल्यामुळे मराठी मते विभागली गेली. महाराष्ट्र एकीकरण समितीचा निसटता पराभव झाला.
गेल्या सहा दशकांपासून लढणाऱ्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातील नेत्यांनी आताही आपला पाठिंबा दर्शवावा, आणि सीमाभागात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रचार सभेत सहभाग घेऊ नये, अशी मागणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.