भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकांसह त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लोकसभेच्या एकुण दोन रिक्त जागांसाठी आणि विविध राज्यातील विधानसभेच्या 14 जागांसाठी येत्या शनिवार दि. 17 एप्रिल 2021 रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठीच्या पोट निवडणुकीबाबत गेल्या कांही महिन्यापासून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता ही उत्सुकता संपुष्टात आली असून निवडणूक आयोगाने येत्या 17 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या दिवशी कर्नाटकातील बेळगाव आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती या लोकसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी मतदान होईल. त्याचप्रमाणे कर्नाटकातील मस्की आणि बसवकल्याण विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे. याव्यतिरिक्त गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओडिसा, तेलंगणा आणि उत्तराखंड येथील विधानसभेच्या प्रत्येकी 1 आणि राजस्थानमधील 3 जागांसाठी याच दिवशी पोटनिवडणूक होणार आहे.
सदर निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे. निवडणुकीची राजपत्रित अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) मंगळवार दि. 23 मार्च 2021 रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 30 मार्च 2021 ही असणार आहे. अर्जांची छाननी बुधवार दि. 31 मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार दि. 3 एप्रिल 2021 ही असणार आहे.
निवडणुकीसाठी शनिवार दि. 17 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून त्यानंतर रविवार दि. 2 मे 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मंगळवार दि. 4 मे 2021 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार असून अन्य सविस्तर माहिती निवडणूक आयोगाचे अंडर सेक्रेटरी संजीव कुमार प्रसाद यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.