बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची शर्यत चुरशीने सुरु असून काँग्रेसतर्फे केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकानमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून भाजपतर्फे विधानपरिषदेचे मुख्य सभासद महांतेश कवटगीमठ यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ३ उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. यापैकी एका उमेदवाराच्या नावावर रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या तीन उमेदवारांमध्ये माजी राज्यसभा सदस्य, विधानपरिषदेचे मुख्य सभासद महांतेश कवटगीमठ, डॉ. सोनवलकर आणि डॉ. रवी पाटील यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. आमदार महांतेश कवटगीमठ हे केएलई संस्था आणि डॉ. प्रभाकर कोरे यांचे स्नेही आहेत राजकीय वारसदार म्हणून गणले जाते.
महांतेश कवटगीमठ हे मराठी भाषिकांच्या जवळचे असल्याने त्यांचे नाव आघाडीवर असल्याचीही चर्चा आहे. रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी हायकमांडच्या निर्णयानंतर निश्चित उमेदवार जाहीर होणार आहे. वरिष्ठ केंद्रीय कमिटीच्या बैठकीत निर्णय घेऊन अंतिम उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.