कांही दिवसांपूर्वी एका नेपाळी व्यक्तीला बेळगावातून नेपाळपर्यंत जाण्यास मदत करणाऱ्या बेळगावच्या बजरंगी भाईजानने तसेच एक कार्य नुकतेच केले आहे. जेंव्हा त्याने नोकरीच्या आमिषाने बेळगावात येऊन लुटल्या गेलेल्या एका असहाय्य इसमाला त्याच्या मूळगावी झारखंडला पोचविण्याची व्यवस्था केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, काही लोकांनी झारखंडच्या एका इसमाला नोकरीच्या आमिषाने बेळगावला आणले, पण जेंव्हा तो बेळगावला येत होता तेव्हा त्याला लुटण्यात आले. परिणामी हा इसम असहाय्य अवस्थेत बेळगाव परिसरात मदतीच्या अपेक्षेने भटकत होता. राहुल गोडसे आणि हॉटेल सलीम वाले यांनी त्याला पाहून विचारपूस करत त्याची सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी संबंधित इसमाला आम्ही त्याच्या गावापर्यंत पोहचवू शकतो असे सांगितले. परंतु जी प्रक्रिया होती ती खूप विलंब लावणारी होती. तेंव्हा त्यांनी त्यांचा निर्णय बदलला.
मग त्यांना आठवला तो काकती -बेळगावचा बजरंगी भाईजान म्हणजे विनायक केसरकर. ज्यांनी कांही दिवसापूर्वी एका नेपाळी व्यक्तीला बेळगावातून नेपाळपर्यंत जाण्यास मदत केली होती. लगेचच त्यांनी विनायक केसरकर यांच्याशी संपर्क साधला. तेंव्हा विनायक केसरकर यांनी त्या इसमाला त्याच्या गावी झारखंडला पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. मात्र तत्पूर्वी त्याने त्या इसमाची चौकशी केली व पडताळणी केली की, खरंच त्याला मदतीची गरज आहे का? मग तो गरजू व्यक्ती बोलला की मी इथे मिळेल ते काम करेन आणि कमवून माझ्या घरी जाईन.
तेंव्हा त्याला एका स्थानिक दुकानात काम दिले.तिथे त्याने थोडे पैसे कमावले. त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा पाहता विनायक केसरकर यांनी लवकरच कांही रक्कम जमा केली आणि त्याची झारखंडला जाण्याची व्यवस्था केेली.
झारखंडपर्यंत थेट गाडी नसल्याकारणाने त्याला पुणे येथे पोचवण्यात आले. पुण्यात संतोष पेटकर यांनी त्याची नागपूर पर्यंतची बसने जाण्याची व्यवस्था केली. नागपुरात कुमारी मिनूश्री महेंद्रकुमार रावत यांनी त्याची राहण्याची व्यवस्था आपला भाऊ श्री.अंकित साकोरे यांच्या घरी केली. नागपूरहून झारखंडपर्यंत जाण्याची व्यवस्था अंकित साकोरे यांनी केली. अशा पद्धतीने सर्वांच्या मदतीने तो इसम त्याच्या घरी 15 मार्च 2021 च्या मध्यरात्री पोहोचला. सर्वांनी माणुसकीच्या नात्याने विनायक केसरकर यांना त्या इसमाला झारखंडला पोहोचविण्यात मदत केली. विनायक केसरकर हे माणुसकी जपताना बेघर झालेल्या आणि फसलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे किंवा त्यांना आसरा मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. झारखंडच्या इसमाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या मदतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.