बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 29 रुग्ण आणि राज्यात काल बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 2,523 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,266 तर राज्यातील 9,78,478 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 18,207 सक्रिय रुग्ण आहेत.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज गुरुवार दि. 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,68,659 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 25,915 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 199 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 24,034 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,18,102 आहे.
कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,67,158 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,266 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज गुरुवारी नव्याने आढळलेल्या 29 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,34,478 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 199 आहेत. त्याचप्रमाणे 2,249 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 343 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,724 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज गुरुवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये रायबाग तालुक्यातील 11, बेळगाव 9, चिक्कोडी 3, सौंदत्ती 2, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग व गोकाक प्रत्येकी 1 अशा एकुण 29 रुग्णांचा समावेश आहे.
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 1192 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 9,47,781 इतकी झाली आहे. काल बुधवार दि. 24 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 2,523 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9,78,478 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 18,207 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 150 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल रात्री 12 वाजेपर्यंत नव्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या 12471 झाली आहे.